११ जून, २०११

पाऊस आणि मी .....

पाऊस ....  नाव घेताच अंगात हूर हुरी भरते. थंडी वाजून येते. आज सकाळ पासून पावसाची लागलेली हि धार मनात आठवणींचा कोरड्या कोपरयात ओलावा पुन्हा घेवून आला आहे. 

मुळचा महाबळेश्वरचा  असल्याने पाऊस माझ्यासाठी काही नवीन नाही. आणि त्याबरोबर येणारी थंडी "अरे बाप रे" .
पाऊस सुरु होताना पहिल्यांदा ज्या गारा पडतात त्या वेचताना जी आमची पळापळ व्हायची ती आज हि आठवली तर हळूच खुदकन हसू येत. मी वेचलेल्या गारा कधीच मला नीट खाता नाही आल्या कारण शेवट पर्यंत सर्वांच पाणी झालेलं असायचं. नंतर दादा कडे रडवेल्या चेहऱ्याने पाहायचं. आणि नंतर त्याच समजावन आज डोळ्यात आसवांची गर्दी करत .

शाळेत असताना ऊन्हाळी सुट्टी असते तशी आमच्याकडे पावसाळी सुट्टी असायची. पूर्ण सुट्टी आजी बरोबर तिच्या उबदार गोधडीत तिच्या गोष्टी ऐकत तर कधी बाबांबरोबर पावसाळी सुट्टीचा आभ्यास पूर्ण करण्यात जाई. हीच वेळ असायची जेव्हा मला माझ्या घरातल्यांबरोबर वेळ मनापासून घालवायला मिळे. नाहीतर अर्ध वर्ष तर माझ पांचगणी च्या वसतिगृहात जाई. 

पाऊस थांबताच सर्व जन आळोखे पिळोखे देवून घराबाहेर निघायचो आणि एकत्र येवून 
"पाऊस आणि माझा अनुभव " या विषयावर सर्व जन तासंतास गप्पा मारायचो. पाऊस शांत झाल्यावर येणार ते धुक आणि तो गारवा आणि त्यातच संध्याकाळी  गरम गरम कॉफ्फी बरोबर , गरम जलेबी नाही तर कांदा भजी " सही यार" 
त्यानंतर हा असा योग फक्त दरवर्षीच्या  पावसाळ्यातच.

पण  आज या पावसाळ्यात फक्त आठवणीच आहेत त्यात आठवणी साठवून ठेवण्यासारख काही नाही . कदाचित हरवलेलं बालपण या सर्वांसाठी जवाबदार असेल. नाहीतर सध्याची प्रगतशील स्थिती जी आठवणीच्या पलीकडे  जावून देताच नाही. नजर त्या पलीकडे जाण्या अगोदरच पाठीमागून हाक ऐकू येते  ती वर्तमानाची जो माणसाला भूतकाळात रामू देत नाही आणि भविष्यात जावू राहू देत नाही ............